CoronaMaharashtraUpdate : पुन्हा एकदा मातोश्रीच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ निवासस्थानापर्यंत करोना विषाणूचा संसर्ग पोहोचलाआहे. मुख्यमंत्र्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना ताजी असतानाच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या सुरक्षारक्षकासोबतच्या इतर सुरक्षारक्षकांचीही करोना चाचणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाल्याला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे मातोश्रीवरील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १३० पोलिसांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर तीन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवतात. बैठका घ्यायच्याच असतील तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यावर त्यांचा अधिकाधिक भर असतो. दरम्यान, राज्यात करोनामुळे काल आणखी २५७ रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता १३ हजार ३८९ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६५ इतका मृत्यूदर आहे. राज्यात काल दिवसभरात ९२५१ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांना राज्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी दिलासा देणारी बाब म्हणजे आज ७२२७ रुग्ण करोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९२० जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ३ लाख ६६ हजार ३६८ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
राज्यात सध्या १ लाख ४५ हजार ८९१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात सर्वाधिक ४६ हजार १३ रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र तिथे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यानंतर ठाण्यात ३६ हजार ६७८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर मुंबईत तुलनेने कमी म्हणजेच २२ हजार ८५४ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये करोनाचा सध्या वेगाने फैलाव होत असून नागपूर वगळता बाकी जिल्ह्यांत दोन हजार ते पाच हजार इतके करोना बाधित रुग्ण आहेत.