MaharashtraNewsUpdate : शरद पवारांनी मुस्लिम समाजाला केले हे आवाहन आणि फडणवीसांना दिला राजकारण न करण्याचा सल्ला

आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम समाजाने बकरी ईद दिवशी दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यानी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचे सांगून त्यांचे कौतुक करून पवार म्हणाले कि , कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, अशा शब्दांतपवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पवार यांनी हे वक्तव्य केले.
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. दुपारच्या सत्रात पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करोना संदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेड उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री करोना संकटात पूर्ण काम करत आहेत, असे सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहोत आणि त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असेही पवारांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टर्सची कमतरता भासणार नाही, मात्र जर डॉक्टर्स टाळाटाळ करत असतील तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करावी इशारा देखील पवार यांनी दिला. लॉकडाऊन बाबत माझी काहीही भूमिका नाही मात्र आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटही मोठं आहे, असे नमूद करत पवारांनी मुंबईच्या बिघडलेल्या आर्थिक घडीवर त्यांनी बोट ठेवले. कामगार करोनाच्या भीतीने इतर राज्यात गेला पण तो आता परत येण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे परिस्थिती सामान्य करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील जनतेचं आम्ही देणं लागतो. फडणवीसांनी देखील या कामात लक्ष घालावे आणि राजकारण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिला.
या बैठकीत बकरी ईद साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन शरद पवार यांनी मुस्लिम बांधवांना केलं. दरम्यान, भाजपने एका शासन निर्णयाचा आधार घेत शरद पवार यांच्या आढावा बैठकीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला शरद पवार भुजबळ यांच्या बाजूला बसले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे बैठकीला व्यासपीठावर होते.