PuneCoronaNewsUpdate : महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही कोरोना

पुण्यात 13 ते 23 जुलै 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत 313 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह 168 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 132 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांची मृत्यू झाला आहे.
दरम्यान कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील. हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.
पुण्यात लॉकडाऊन गुरुवारी संपला. पण आता लॉकडाऊन संपल्या संपल्या धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 9409 होती. तर 874 मृतांचा आकडा होता. 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ॲक्टिव्ह रूग्णसंख्या तब्बल 17,056 आणि 1104 मृत्यू झाले. त्यामुळे आकडे वाढायचे थांबत नाही. दरम्यान, रुग्णवाढीमुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. ते 16 ते 21 जुलै दरम्यान 45.9 टक्क्यांवर आले आहे. हेच प्रमाण 9 ते 15 जुलै दरम्यान 71.9 टक्के इतकं होतं तर 2 ते 8 जुलै दरम्यान 65.3 टक्के होतं. मात्र पूर्ण जिल्ह्याचा विचार करता मृत्यू दर कमी झाला आणि देशाचा,राज्याचा, मुंबईचा विचार करता सर्वात कमी मृत्यू दर पुण्याचा आहे. देशातील मृत्यू दर 2.41आहे तर पुणे जिल्ह्याचा 2.35 आहे. दरम्यान, पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत.