MaharashtraNewsUpdate : बकरी ईदच्या सरकारी गाईडलाईन वरून मुस्लिम समाजात असंतोष, नेत्यांनी उघड केली नाराजी

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईनला मुस्लिम नेत्यांकडून विरोध केला जात असून मुस्लिम समाजामध्ये यावरून मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सरकारच्या गाईडलाईनला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत काँग्रेस नेते नसीम खान यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. बकरी ईद साजरी कशी करावी, या मध्ये त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांना विरोध दर्शवला आहे.
प्रतिकात्मक बकऱ्याची कुर्बानी होऊ शकत नाही किंवा ऑनलाइन खरेदी होऊ शकत नाही. प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी असल्याने उद्धव ठाकरे सरकारची ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारत नसल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारनं तात्काळ बैठक घेऊन या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, असंही नसीम खान यांनी पत्रात म्हटलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं आपल्याला परवडणारं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात बैठक घेतली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी बकरी ईद साजरी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मटन उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटन विक्रीस प्राधान्य द्यावं. मटन शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ‘हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला, मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन, असंही ठाकरे म्हणाले होते.