IndiaNewsUpdate : “हे” खासदार महाशय म्हणतात , सामूहिक नमाज पठणाची परवानगी द्या , कोरोना पळून जाईल…

धार्मिक श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा हिंदू , मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात सारख्याच आहेत . कोणीही कोणापेक्षा तसूभरही कमी नाही. अल्लाहला मानणाऱ्या तबलिगीची काय अवस्था झाली ? ते सर्वांनी पहिले , येशूला मानणाऱ्या युरोपात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. आणि सध्या ताजी बातमी म्हणजे सर्व देशातील हिंदू भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या पुजारी आणि कर्मचाऱ्यांसहीत जवळपास १४० जण करोना संक्रमित झाले आहेत. त्यामुळे देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बारेड्डी यांनी मंदिरात सार्वजनिक दर्शनाची योजना नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान हिंदू भाविक तर होम हवन , पूजा अर्चा , आरती यामुळे कोरोना पळून जाईल अशा वलग्नही करण्यात आल्या . याच मालिकेत आता कोरोनाला पळवून लावण्यासाठी समाजवादी पक्षाच्या एका खासदार महाशयांनी मशिदीतील सामूहिक नमाज पठणाची मागणी उचलून धरली आहे. इतकंच नाही तर ‘मशिदीतील सामूहिक नमाज पठणामुळे करोना पळून जाईल’ असंही त्याचं म्हणणं आहे. करोनापासून सुटका मिळवायची असेल तर सरकारनं मशिदीत सामूहिक नमाजाची परवानगी द्यायला हवी, अशी लेखी मागणीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निवेदनाद्वारे समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांनी मशिदीतील नमाज पठनानं करोना पळून जाईल, असा दावा केलाय. देशातून करोना पळवून लावायचा असेल तर भारत सरकारनं मुस्लिमांना मशिदीत सामूहिक नमाज करण्यासाठी परवानगी द्यावी, असा सल्लाच त्यांनी दिलाय. ‘ईद – उल – जुहा’ सणाच्या निमित्तावर सरकारनं मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केलीय.
मुस्लिमांच्या सामूहिक नमाजवर बंदी घालणं चुकीचं असल्याचं सांगत देश वाचवण्यासाठी मुस्लिमांचं नमाज पठण गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नमाज अदा केला नाही तर करोना महामारी नष्ट करता येणार नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. नुकतीच खासदार डॉ. बर्क यांनी अनेक मौलाना आणि मुस्लीम नेत्यांसाठी जिल्हाधिकारी अविनाश कृष्ण सिंह आणि पोलीस अधिक्षक यमुना प्रसाद यांची भेट घेऊन सामूहिक नमाज पठणाच्या परवानगीची मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेश पुढे करत परवानगी देण्यास असमर्थता व्यक्त केली. सध्या मशिदीत सामूहिक नमाजावर बंदी असली तरी मशिदीत एका वेळी केवळ पाच जणांना नमाज पढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.