सुजय पाठोपाठ रणजितसिंह मोहिते-पाटीलही कमळाच्या मोहात…

विजयसिंह मोहिते-पाटील यांचा माढा मतदार संघ सोडण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी करुनही ही उमेदवारी आपल्याला मिळेलच याची खात्री वाटत नसल्यामुळे कि काय ? मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते-पाटील सुद्धा भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुजय विखे पाटील यांच्या रुपाने काँग्रेसला धक्का बसल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी शिवनेरीवर दाखल झाले होते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असली तरी विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवाय राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचंही चर्चेत आहे.