सुजयच्या भाजपप्रवेशाबद्दल काय म्हणाले विखे-पाटील ?

“सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता नव्हती. म्हणून नाइलाजास्तव हा निर्णय त्यांनी घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे” असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे. नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा काही सुटला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा न सोडण्याचा निर्णय घेतल्याने सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने थेट विधानसभेच्या विरोधीपक्ष नेत्याच्या घराला खिंडार पाडून काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. मात्र या प्रकरणी “मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार नाही, पक्ष जी भूमिका घेईल ती मला मान्य असेल, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन” अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली आहे.