‘शोले’ फेम ज्येष्ठ अभिनेते ‘सूरमा भोपाली’, जगदीप यांचे निधन

‘शोले’ फेम ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे आज वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली. उद्या त्यांचा दफनविधी होणार आहे. जगदीप यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टी एका निखळ मनोरंजन देणाऱ्या दमदार अभिनेत्याला मुकली आहे. ‘शोले’ चित्रपटात ‘सूरमा भोपाली’ची भूमिका जगदीप यांनी साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना फार मोठं ग्लॅमर मिळालं होतं. जगदीप यांचं मूळ नाव सय्यद इश्तियाक जाफरी असं होतं. अभिनेता जावेद जाफरी हा त्यांचा मुलगा आहे.
जगदीप यांच्या पश्चात मुलगा जावेद, निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांनी प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीची सेवा केली. तब्बल ४०० चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या निधनाने एका दिग्गज विनोदी कलावंताला बॉलीवूड मुकल्याची भावना विविध कलावंतांनी व्यक्त केली आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटात जगदीप यांनी सूरमा भोपाली हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९९४ मध्ये अंदाज अपना अपना या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.
जगदीप यांचा अल्प परिचय
जगदीप यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात २९ मार्च १९३९ रोजी दतिया सेंट्रल प्रांतात झाला. चंदेरी दुनियेत त्यांनी बालकलाकार म्हणून पहिले पाऊल ठेवले. बी. आर. चोप्रा यांच्या अफ्साना चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यानंतर ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुराना मंदिर, थ्री डी सामरी या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले.
जगदीप यांना विविध कलावंतांनी श्रद्धांजली वाहिली. ‘जगदीप यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांना स्क्रीनवर पाहताना नेहमीच आनंद मिळाला. प्रेक्षकांना त्यांनी निखळ मनोरंजनाचं दान दिलं. जावेद तसेच कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, अशा भावना अभिनेता अजय देवगणने व्यक्त केल्या. प्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लीव्हर यांनीही तीव्र शोक व्यक्त केला. माझा पहिला चित्रपट रे रिश्ता ना टूटे हा होता. त्यात प्रथमच मी कॅमेऱ्याला सामोरा जात होतो आणि या चित्रपटात मला जगदीप यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. जगदीप यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना जॉनी लीव्हर यांनी व्यक्त केल्या.