CoronaIndiaUpdate : हरियाणाच्या ऐतिहासिक पानिपतमध्ये कोरोनाचा कहर

हरियानामधील ऐतिहासिक शहर पानीपत शहरात शनिवारी तासाभरातच ५ बेवारस मृतदेह सापडल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्या सर्व मृतदेहांची आता कोरोना चाचणी होणार आहे. पोलिसांना स्थानिक लोकांनी त्यांच्या भागात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ठराविक अंतराने अशाच प्रकारची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानंतर पोलिस स्थानिक सामाजिक संघटनांच्या मदतीने त्या सर्व मृतदेहांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असून त्यांची आता कोरोना चाचणी होणार आहे.
या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. यातले बहुसंख्य जण हे बेघर असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासन चिंतेत असून नेमकं कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठोस सांगता येणार नाही असं प्रशासनाने म्हटलं आहे. शहरात संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याने या घटनेने जास्तच चिंता निर्माण झाली आहे. शनिवारी एकाच दिवसात देशात तब्बल २३ हजार कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. तर महाराष्ट्रात सर्व रेकॉर्ड मोडले असून एकाचदिवसात तब्बल 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाच्या सर्व प्रयत्नानंतरही संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.