लॉकडाऊन दरम्यान पत्नी घर सोडून गेल्याने तीन मुलांची क्रूर हत्या करून पित्याचीही आत्महत्या

नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका इसमाने आपल्या तीन लहान कोवळ्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मयत कैलास परमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पूर्वेकडील डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा इथे कैलास परमार रहात होता. शनिवारी रात्रीच्या 7 ते 8 च्या सुमारास त्याने नंदीनी परमार (8), नयना परमार (3) आणि नयन परमार (12) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली. त्यांचा लसूण विक्रीचा धंदा होता. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याची पत्नी घर सोडून गेली होती. त्या नैराश्यामुळे त्यांनी हा घातपात करून स्वतःला संपवले असल्याच सूत्रांनी सांगितले आहे.
या सगळ्या हत्या आणि आत्महत्येचा प्रकरणात कौटुंबिक किंवा आर्थिक कारण आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास परमार हा तीन मुलांचा सांभाळ करायचा त्याची पत्नी लसूण विक्री करायची. तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. दरम्यान, फेसबुकवर त्याने त्याच्या पत्नीचा फोटो पाहिल्यानंतर त्याने हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरात हाती लागलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात कैलासच्या पत्नीची चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.