चर्चेतली बातमी : पतंजलीच्या ‘ कोरोनील ‘ ची माहिती नाही , आयुषची जाहिरातीवर बंदी

योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध बनवल्याचा दावा करून पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ या आयुर्वेदीक औषधाने रुग्ण पूर्णपणे बरे होतात, असं रामदेव बाबा म्हणाले असले तरी यासंदर्भात कुठलीही माहिती नसल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान पतंजलीने कुठल्या वैज्ञानिक अभ्यासावरून करोनावर औषध बनवण्याचा दावा केला आहे, याची माहिती नाही. पतंजलीच्या औषधाची पूर्ण माहिती मागवण्यात आली आहे, असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तसंच पतंजलीने औषधाच्या जाहिराती तात्काळ रोखाव्यात अशा सूचनाही आयुष मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
याबाबत खुलासा करताना आयसीएमआरचे अधिकारीच माहिती देऊ शकतील, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. तर आयुर्वेदिक औषधाशी संबंधित सर्व जबाबदारी ही आयुष मंत्रालयाची आहे. यामुळे यावर आयुष मंत्रालयच बोलू शकतं, असं आयसीएमआरकडून या आधीच सांगण्यात आले आहे. पतंजलीचे प्रमुख आणि योगगुरु रामदेव यांनी ‘कोरोनिल’ हे औषध कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १०० टक्के यशस्वी ठरत असल्याचा दावा केला. हरिद्वारमध्ये मंगळवारी ‘कोरोनिल’ हे औषध लाँच करण्यात आले. या औषधाने करोनाचे सर्व रुग्ण बरे होण्यासाठी ३ ते ७ दिवस लागतात. पतंजली ‘दिव्य कोरोना किट’मध्ये कोरोनिल, श्वसारि वटी आणि अणु तेल यांचा समावेश आहे, असा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. या औषधाच्या क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करण्यात आल्या आहेत. त्यात सात दिवसाच्या आत सर्व रुग्ण शंभर टक्के बरे झाले, असं रामदेव बाबा म्हणाले. हे औषध आठवड्याभरात पतंजलीच्या स्टोअरवर उपलब्ध करण्यात येणार होते. तसंच यासाठी सोमवारी अॅपही लाँच करण्यात येणार होते.