MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : सुशांतच्या मृत्यूची उलट-सुलट चर्चा अजूनही चालूच…

राज्य शासनाच्या आदेशानुसार बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची मुंबई पोलीस कसून चौकशी करीत असले तरी सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी दावा केला की सुशांतचा घराणेशाहीमुळे बळी गेला. याचमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने जगण्यापेक्षा मरण पत्करलं. दरम्यान, सोशल मीडियावर अशाही चर्चा सुरू झाल्या की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली. सुशांतसिंह राजपूत च्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे. आत्महत्येमध्ये गुदमरून मृत्यू होतो. याशिवाय या अहवालात गळा दाबून मारण्याचा किंवा इतर कोणत्याही झटापटीचा उल्लेख नाही. त्यामुळे सुशांतची हत्या झाली असेल या दाव्यात कुठलेली तथ्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान काही सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार ज्या खोलीत सुशांतने आत्महत्या केली तिथे स्टूल किंवा खुर्ची अशा उंच गोष्टी आढळल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅनपर्यंत पोहोचण्यासाठी सुशांतच्या बेडची उंची आणि त्याची उंची पुरेशी होती. सुशांत उंच असल्यामुळे त्याला अतिरिक्त सामानाची गरज भासली नाही. मेडिकल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्यामते, अनेक केसमध्ये असे आढळून आले आहे कि , बऱ्याच वेळा ज्या गोष्टींचा आधार घेऊन फाशी लावली जाते त्यात आणि आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या पायांमध्ये फार कमी अंतर असते. त्यामुळे असे म्हटले जाते की, सुशांतच्या आत्महत्येमध्येही असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुशांच्या काही चाहत्यांकडून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सुशांतची हत्या केल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद केला गेला. दरम्यान याबाबत पोलिसांनी चावी तयार करणाऱ्याचाही जबाब घेतला आहे. चावी तयार करणाऱ्याने स्पष्ट केलं की, दरवाजा आतून बंद होता. त्याने सांगितलं की, सुशांतचा दरवाजा सुरुवातीला बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या दरवाजाच्या लॉकसोबत कोणीही छेडछाड केली नव्हती आणि दरवाजा बाहेरूनही बंद नव्हता. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन सुशांतची हत्या केल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं समोर येतं. शवविच्छेदनाचे रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि चावी बनवणाऱ्याचा जबाब यावरून सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट होतं. मुंबई पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. यानंतर पोलीस व्यावसायिक शत्रूत्व, नैराश्य आणि खासगी आयुष्य या सर्व गोष्टींचा तपास केला जात आहे. याचमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या दाव्यांवर लक्ष न देण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.