RajyasabhaNewsUpdate : भाजप -काँग्रेस प्रत्येकी तीन , वायएसआर सर्व चार जागा

शुक्रवारी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, शिबू सोरेन हे नेते निवडून आले असून या पैकी राजस्थानमध्ये कोंगेला दोन जागा, भाजपाला एक जागा, मध्यप्रदेशमध्ये भाजपला दोन , काँग्रेसला एक जागा तर आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने सर्व चार जागा मिळवल्या आहेत. दरम्यान गुजरात आणि मणिपूर या राज्यांमध्ये मात्र निकालांकडे लक्ष लागले आहे.
देशात एकीकडे करोनाच्या साथीचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू असतानाच, राज्यसभेच्या आठ राज्यांतील एकूण १९ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. मध्य प्रदेश आणि राजस्थानातील विलगीकरणात असलेले दोन आमदार या मतदानासाठी पीपीई सूट परिधान करून आल्याचे दिसले. राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि नीरज डांगी, तर भाजपचे राजेंद्र गहलोत विजयी झाले. मध्य प्रदेशात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, तर भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी यांनी विजय मिळवला.
दरम्यान झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि भाजपचे दीपक प्रकाश यांनी विजय मिळवला. आंध्र प्रदेशात पिल्ली सुभाष चंद्र बोस, मोपिदेवी वेंकट रामणा, परिमल नाथवानी आणि अयोध्या रामी रेड्डी हे वायएसआरचे चारही उमेदवार यशस्वी ठरले. तर ईशान्येत मेघालय आणि मिझोराम राज्यांमध्ये सत्ताधारी आघाड्यांनीच विजय मिळवत आपले उमेदवार राज्यसभेत पाठवले. मणिपूरमध्ये सत्ताधारी आघाडीच्या नऊ आमदारांनी राजीनामा दिल्याने राजकीय पेचप्रसंग उद्भवला आहे, तर गुजरातमध्ये भाजपच्या दोन आमदारांची मते वेगवेगळ्या कारणांवरून ग्राह्य धरू नयेत, अशी मागणी काँग्रेसने केल्याने मतमोजणी लांबली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भारतसिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे, तर सत्ताधारी भाजपने अभय भारद्वाज, रमिलाबेन बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवलं आहे.