चर्चेतली बातमी : सुशांतच्या आत्महत्येवरून उलट -सुलट चर्चेला जोर , राम गोपाल वर्मा यांचीही चर्चेत उडी

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून सिनेसृष्टीत खळबळ उडाली असून अनेकांनी त्याच्या आत्महत्येला अनेकांना जबाबदार ठरविले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान विविध कारणाने चर्चेत राहणारे निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यानं विविध क्षेत्रातील घराणेशाहीचे दाखले देत या मुद्द्यावर बॉलिवूडचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे
स्वतःच्या अभिनयाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत महत्वाचे स्थान पटकावणाऱ्या सुशांतसिंह याने रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येमुले केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येला भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा बळी ठरला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. चित्रपटसृष्टीत ठराविक घराण्यांचं प्रचंड वर्चस्व आहे. त्या घराण्याशी संबंधित नसलेल्या किंवा एखादा गॉडफादर नसलेल्या नवोदितास इथं टिकून राहणं नेहमीच कठीण जात असल्याचं सांगितलं जातं. बॉलिवूडमधील कंगना राणावत सारख्या अभिनेत्री सातत्यानं त्या विरोधात आवाज उठवत आल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यानं याच अनुषंगानं एक ट्विट केलं आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही त्यानं नाकारलेली नाही. मात्र, यात वावगं काही नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यानं देशातील राजकीय व उद्योग क्षेत्रातील काही घराण्यांचाही उल्लेख केला आहे. मुलायमसिंह यादव, उद्धव ठाकरे यांच्यासारखे राजकारणी आपल्या मुलांना, नातलगांना जसं पहिलं प्राधान्य देतात? धीरूभाई अंबानी जसं मुकेश आणि अनिल यांनाच आपली सर्व संपत्ती देतात. त्याचप्रमाणं, इतर सर्वच कुटुंबं जशी त्यांच्याच कुटुंबांना पहिलं प्राधान्य देतात. बॉलिवूडमधील कुटुंबंही अगदी तसंच करतात. मग घराणेशाही कुठं नाही?,’ असा प्रश्न वर्मा याने केला आहे . दरम्यान, सुशांतसिंह याच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील राजकारण कारणीभूत असल्याच्या चर्चेची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. ‘सुशांतच्या आत्महत्येचा तपास त्या दिशेनंही केला जाईल,’ असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.