IndiaNewsUpdate : पंतप्रधान मोदींची आज आणि उद्या देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. करोनाला रोखायचं असेल तर नागरिकांनी नियमांचं पालन करावं. नियमांचं पालन केलं तर कमी नुकसान होईल. मास्कशिवाय बाहेर पडणं सगळ्यात धोकादायक आहे असं त्यांनी सांगितलं. इतर काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नियंत्रणात आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. देश आता पूर्वपदावर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नियमांचं पालन केलं नाही तर कोरोनाला रोखता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ते पुढेे म्हणाले, जेवढे लोक नियमांचं पालन करतील तेवढं कोरोनाला रोखता येईल. आणि हे झालं तरच अर्थव्यवस्था रुळावर येईल. आता भारताची निर्यात वाढत आहे. कारखाने सुरू झाले आहेत. लोक कामावर जात आहेत. मात्र हे संकट मोठं असल्याने सगळ्यांनीच काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान आज आणि उद्या अशा दोन टप्प्यांमध्ये मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी यात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 43 हजार 91वर पोहचला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या 1 लाख 53 हजार 178 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या 9 हजार 900 आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा रिकव्हरी रेट 52.5% वाढला आहे. यात सर्वात जास्त रिकव्हरी रेट हा महाराष्ट्राचा आहे. त्यचबरोबर आसाम, बिहार, छत्तीसगढ़, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, मणिपुर, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात दररोज 10 हजारहून अधिक रुग्ण निरोगी होत आहेत. त्यामुळं राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात जास्त असला तरी, चिंतेची बाब नाही आहे.