सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : बिहार मध्येही शोककळा , उद्या मुंबईत होणार अंत्यसंस्कार , मृत्यूच्या चौकशीची मागणी

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आज मुंबईत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि राजकारणातही मोठा धक्का बसला आहे. तर सुशांतवर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे. इतकंच नाही तर त्याचे वडील केके सिंह, आमदार नीरज बबलू , पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौल यांच्यासह अन्य दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी सोमवारी 11.20 वाजता मुंबईला रवाना होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
सुशांतच्या आईचे 2002 मध्ये निधन झाले. याशिवाय त्याच्या चार बहिणी आहेत, त्यापैकी एक मीटू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. सुशांतचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र, कोड लॉकमुळे फोन उघडता आला नाही. सुशांतचा फोन अनलॉक झाल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस सुशांतच्या मित्रांचीही चौकशी करणार असल्यांच बोललं जात आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र, दुसरीकडे बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. सुशांतच्या दु:खद निधनाचं वृत्त समजताच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार भावूक झाले. सुशांतच्या अकाली निधनानं बॉलिवूडचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे.
माजी खासदार पप्पू पांडेय यांनी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांच सांत्वन केलं. त्यानंतर पप्पू पांडेय यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. सुशांत आत्महत्या करू शकत नाही. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी, पप्पू पांडेय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सुशांतच्या अकाली निधनामुळे बिहारामधील युवावर्गाचं मोठं नुकसान झालं आहे.
केंद्रीय मंत्री अश्वनी कुमार चौबे यांनी म्हटलं की, बिहारचा राहणाऱ्या सुशांत याने बॉलिवूडमध्ये अल्पावधीत यशोशिखर गाठलं होतं. त्याच्या निधनाच्या वृत्त हृदयद्रावक आहे. परमेश्वर सुशांतचा परिवार आणि चाहत्यांना दुःख सहन करण्याची शक्ति देवो.. ही प्रार्थना..! दुसरीकडे, लोकजनशक्ति पक्षाचे नेता चिराग पासवान यांनीही सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बिहारचं नाव उज्ज्वल केलं, असं चिराग पासवान यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि खासदार मीसा यादव यांनाही सुशांत सिंहच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनीही सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.