CoronaMaharashtraUpdate : कोवीडच्या चाचण्यांचे खासगी लॅबचे राज्य शासनाने निश्चित केलेले दर जाणून घ्या…

खासगी रुग्णालयात कोरोनाची चाचणी करून घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला असून खासगी लॅबमध्ये होणाऱ्या करोना चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे यापुढे खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी साडेचार हजारांऐवजी फक्त २,२०० रुपये मोजावे लागणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड चाचणीच्या सुधारीत दरांची यादी जाहीर केली. कोविड चाचणीचे नवे दर हे देशात सर्वाधिक कमी आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. नव्या निर्णयानुसार, खासगी लॅबना रुग्णालयांतून घेतलेल्या स्वॅब नमुन्यांसाठी केवळ २२०० रुपये आकारता येणार आहेत. तर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅबचे नमुने घेतल्यास त्यासाठी २,८०० रुपये आकारता येतील. पूर्वी हेच दर अनुक्रमे ४,५०० व ५,२०० असे होते.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि , खासगी लॅबसाठी नवे दर बंधनकारक असणार आहेत. जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील खासगी लॅबशी संपर्क साधून यात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करू शकतात. मात्र, सरकारने ठरविलेल्या दरांपेक्षा एक पैसाही अधिक आकारता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. सध्या राज्यात कोविडची चाचणी करणाऱ्या ९१ लॅब आहेत. आणखी पाच ते सहा लॅब लवकरच कार्यरत होतील. नव्या दरांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आधीचे कोविड चाचणीचे दर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने ठरवून दिले होते. मात्र, यात आणखी कपात होऊ शकते का ? याची चाचपणी करण्याच्या सूचना आयसीएमआरने राज्याला दिल्या होत्या. त्यानुसार सरकारमान्य खासगी लॅबमधील कोविड चाचणीसाठी नवे दर ठरविण्यासाठी मागील आठवड्यात चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले, ग्राण्ट मेडिकल महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अमित जोशी यांच्यासह आरोग्य सेवा संचालकांचा समावेश होता. त्यांनी चर्चेअंती हे दर ठरविले आहेत. राज्यातील सर्व सरकारी लॅबमध्ये मोफत करोना चाचणी केली जाते.