CoronaEffect : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला मोदी सरकार जबाबदार, अहंकार आणि अकार्यक्षमतेमुळे देशावर संकट : राहुल गांधी

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला मोदी सरकार जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. अहंकार आणि अकार्यक्षमतेमुळे भारत कोरोना संसर्गामध्ये जगातील पहिल्या क्रमांकावर येण्याच्या नको असलेल्या शर्यतीत वेगाने पुढे जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरातील कोरोनाच्या रुग्णांवर नजर ठेवणाऱ्या वर्ल्ड मेट्रोमीटर आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, भारत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्रिटनला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे.
याबाबत राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारवर हा हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ‘भारत चुकीची शर्यत जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही भयानक शोकांतिका म्हणजे व्यर्थ आणि निरुपयोगीपणा यांच्या घातक मिलाफाचा परिणाम.’ राहुल गांधी यांनी या ट्वीटसोबत एक व्हिज्युअल ग्राफ देखील दिला आहे. यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संदर्भात भारत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचे दर्शवण्यात आले आहे.
दरम्यान, या ट्विटपूर्वी सकाळी राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी मुत्सद्दी निकोलस बर्न्स यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहुल गांधी यांनी चर्चा केली. त्या वेळीही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. भारत आणि अमेरिकेत आता पूर्वीसारखी सहिष्णुता राहिलेली नाही, असा दावा करतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमेरिकेत आफ्रिकी-अमेरिकी आणि इतर लोकांमध्ये विभागणी केली जात आहे. त्याच प्रमाणे भारतात हिंदू, मुस्लिम आणि शीख यांना विभागून देशाचा पाया कमकुवत करणारे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणू लागले आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लागावला आहे. अमेरिकेचे माजी मुत्सद्दी निकोलस बर्न्स यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहुल गांधी यांनी चर्चा केली. कोविड -१९ च्या संकटानंतर आता नवे विचार उभारणी घेऊ शकतात, असे ते म्हणाले. विभाजन हा देशाचा कमकुवतपणा आहे, परंतु जे लोक असे विभाजन करतात ते याला देशाचे सामर्थ्य म्हणून सादर करत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.