MumbaiNewsUpdate : भाजपनेते किरीट सोमय्या यांचे मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप , राज्यपालांचे लक्ष घालण्याचे आश्वासन

https://twitter.com/KiritSomaiya/status/1271381888943316993
भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुंबईतील रुग्णालयांमधून करोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करणारे निवेदन सादर केले त्यावर राज्यपालांनी गृह व आरोग्य सचिवांना या प्रश्नी लक्ष घालण्यास सांगण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
मुंबई महापालिका रुग्णालयांच्या कटू आणि संतापजनक अनुभवाबाबत पीडित कुटुंबातील सदस्यांसह किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतली. अतुल भातखळकरही यावेळी त्यांच्यासोबत होते. सोमय्या यांनी मुंबईतील रुग्णालयांत करोना बाधित रुग्णांची कशी हेळसांड सुरू आहे, हे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. मुंबईत किमान अर्धा डझन करोना बाधित रुग्णांच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे रुग्ण आधी बेपत्ता वा पळून गेल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रश्नी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या, अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत एक निवेदन सोमय्या यांनी राज्यपालांना दिले असून याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुंबईतील विविध रुग्णालयांमधून सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी त्याबाबत तपशील दिला आहे. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर मिळाला होता. त्याआधी परळ येथील केईएम रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालय तसेच वरळीतील रुग्णालयातूनही अशाचप्रकारे मृतदेह गायब झाल्याचे आढळून आले आहेत. सायन रुग्णालयात मृत पावलेल्या एका महिलेवर नातेवाईकांना कोणतीच कल्पना न देता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांची अशी मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी आधीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.