CoronaEffectUpdate : सावधान : कोरोनामुळे जाऊ शकतो १० कोटी लोकांचा जीव , तत्ज्ञ डॉक्टरांच्या संशोधन अहवालाने खळबळ

जगभर कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरु असून यामुळे सर्व जग त्रस्त झाले आहे. जगातले १९० देश या व्हायरसमुळे ग्रासले आहेत. काही देशांनी व्हायरसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केलेला असला तरी त्याचा धोका टळलेला नाही. जगात या व्हायरसमुळे तब्बल १० कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती जगप्रसिद्ध Lancet मासिकात आलेल्या एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. Active case finding with case management: The key to tackling the COVID-19 pandemic असे या संशोधन अहवालाचे शिर्षक असून चीनचे तत्ज्ञ डॉक्टर गाओ फू यांच्या नेतृत्वाखाली हा लेख तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिला आहे.
दरम्यान १९१८ मध्ये आलेल्या महामारीत जगात कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता. त्यापेक्षाही कोरोनाची साथ भयानक असल्याचं त्यात म्हटलं आहे. इतर साथीच्या आजारांपेक्षा कोरोनाचा आजार भयंकर आहे. त्याच बरोबर त्याचा मृत्यूदरही जास्त असल्याचं निरिक्षण यात नोंदविण्यात आलं आहे. जगात आत्तापर्यंत कोरोनामुळे ४ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून ७३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे.
या अहवालानुसार जगभरातले साथीचे रोग, त्याचे परिणाम, मत्यूची संख्या, त्यावरचं औषध, ते हाताळण्यासाठीचे प्रयोग अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि संशोधन करून हा शोध घेण्यात आला आहे. यावर अजुन औषध मिळालेलं नसल्याने व्हायरस अधिक शक्तिशाली झाला आहे. त्यामुळे जास्त धोका आहे. चीनमध्येही पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोकं वर काढू शकतो अशी शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.