पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

हिंगोली तालुक्यातील मोरगव्हाण येथील ईसापूर धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या हिंगोली शहरातील तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. तर इतर दोघे बचावले आहेत. दरम्यान या तीन तरुणांच्या मृत्यूच्या घटनेमुळं हिंगोली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी कि , हिंगोली शहरातील २० ते २५ वयोगटातील ५ तरूण कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण-ईसापूर धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात पोहण्यासाठी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मित्रांसोबत गेले होते. धरणात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने योगेश बालाजी गडप्पा (वय २०, रा. बियाणीनगर हिंगोली), शिवम सुधीर चोंढेकर (वय २१, भट्ट कॉलनी हिंगोली), रोहित अनिल चिंत्तेवार (वय २३, रा. पोस्ट ऑफीस रोड हिंगोली) या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर निखिल नागोराव बोलके (मोरगव्हाण), श्रीकांत संजीव चोंढेकर हे दोन जण बचावले. त्यांनी धरणाबाहेर येऊन आरडाओरड केली. मोरगव्हाण परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याबाबतची माहिती कळमनुरी पोलिसांना देण्यात आली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, ज्ञानोबा मुलगीर, पवार, वाढे, शाम गुहाडे, नलवार, गणेश सूर्यवंशी यांचे पथक आणि नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळ अधिकारी यु. आर. डाखोरे, घटनास्थळी दाखल झाले. कळमनुरी येथील शिवसेनेचे कांता पाटील, बब्बर पठाण, आप्पा कदम, योगेश कांबळे यांच्यासह नागरिक व पोलिसांनी या तरुणांचा शोध घेतल्यानंतर योगेश गडाप्पा, शिवम चोंढेकर, रोहित चिंचेवार या तीन तरुणांचे मृतदेह एका तासानंतर बाहेर काढले. त्यानंतर तीनही तरुणांचे मृतदेह कळमनुरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तिघे तरूण जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मुले असून या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.