#CoronaVirusPuneUpdate : रांजणगाव एमआयडीसीत एका कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ….

राज्य सरकारच्या आदेशानुसार काही प्रमाणात कारखाने सुरु झाले असले तरी बऱ्याच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव व चाकण औद्योगिक वसाहतीत आता कोरोचा शिरकाव झाला असून रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कंपनीत हा कामगार पुण्याच्या हडपसर भागातून कामासाठी येत होता. परंतु या कामगारांचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूनंतर जेंव्हा या कामगाराची कोरोना टेस्ट केली तेंव्हा त्याला कोरोना झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
या कामगाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त येताच रांजणगाव औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर ५० कामगारांना आता क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी येथेही एका प्रसिद्ध आणि बड्या कंपनीतील कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. या कामगारावर पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा कामगार पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी इथून चाकण औद्योगिक वसाहतीत कामाला येत होता. त्यामुळे या कामगाराच्या संपर्कातील कामगारांनाही प्रशासनानं आता क्वॉरंटाईन केलं आहे.