#CoronaMumbaiUpdate : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजारावर तर पुण्यात होते आहे घट….

आतापर्यंत मुंबईत ३२ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना बळींची संख्या १ हजार ९७ एवढी आहे. तसेच आज १ हजार ४४ नवे करोना रुग्ण सापडल्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३३ हजार ८३५ झाली आहे. मुंबईत काल २४० रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे करोनामुळे बरे होणाऱ्यांची संख्या ९ हजार ५४ झाली आहे. काल दगावलेल्या ३२ रुग्णांपैकी १५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. दगावलेल्या रुग्णांमध्ये १९ पुरुष आणि १३ स्त्रीयांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांपैकी ३ रुग्ण ४० वर्षाच्या खालील आहेत. तर १२ रुग्णांनी वयाची साठी ओलांडलेली आहे. तर इतर १७ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत.
भविष्यातील रुग्णसंख्या गृहीत धरून भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात ३० खाटांचे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. अग्निशमन दलातील ३५ जवानांना करोनाची लागण झाल्याने हे कोविड सेंटर तयार करण्यता आले आहे. या करोना सेंटरमध्ये चार डॉक्टर असतील. तसेच चार नर्सेसही या कोविंड सेंटरमध्ये असणार आहेत. मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही ७९ करोनाबाधित सापडले असून त्यामुळे नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १ हजार ८५३वर गेली आहे. तसेच आज नवी मुंबईत ५ जणांचा मृत्यू झाल्याने येथील मृतांची संख्या ५९वर पोहोचली आहे.
दरम्यान पुणे शहरात गेल्या २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखींची संख्या वाढताना दिसत असली तरी बुधवारी शहर जिल्ह्यातील करोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. शहर जिल्ह्यात करोनाचे १६३ नवे रुग्ण आढळले असून समाधानाची दुसरी बाब म्हणजे १८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, १७१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून मृतांच्या संख्येने तीनशेचा आकडा गाठला आहे.