#CoronaMumbaiUpdate : मुंबईत १४११ नवीन रुग्णांची नोंद , एकूण रुग्णसंख्या २२ हजारावर

करोनाबाधितांचा आकडा राज्यात वाढत असतानाच, मुंबईतही रुग्णसंख्येत भर पडत आहे. मुंबईत आज ४३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृत्यूची संख्या ८०० झाली आहे. तर आज १४११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण बाधितांची आकडा २२,५६३वर पोहोचला आहे.
मुंबईची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत आज ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १५ बाधितांचा मृत्यू ६ ते १५ मे दरम्यान झाला आहे. ४३ पैकी ३२ रुग्णांना काही अतिजोखमीचे आजार होते. तर यामध्ये २९ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दोघांचे वय ४० वर्षांखालील होते. तर २० जणांचे वय ६० वर्षांवरील होते. उर्वरित २१ रुग्णांचे वय हे ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.
मुंबईत आज दिवसभरात १४११ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४२८ जणांची चाचणी १४ ते १६ मे दरम्यान झाली होती. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून, ही आकडेवारी आजच्या अहवालात नोंदवण्यात आली आहे. तर आज ७२७ संशयित रुग्ण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. संशयित रुग्णांची एकूण संख्या २०,८८१ झाली आहे. तर आज दिवसभरात ६०० रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही ६११६ झाली आहे. कोविड १९ आजाराचे मध्यम किंवा तीव्र तीव्र स्वरूप, तसेच इतर आजार असलेल्या कोविड रुग्णांसाठी अधिकाधिक खाटा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत सरकारी आणि खासगी अशा मिळून एकूण ३८ रुग्णालयांत ५०३० खाटा उपलब्ध आहेत.