चर्चेतली बातमी : संभाजीराजे कडाडले , देवेंद्र फडणवीस माफी मागा , फडणवीसांनी ” ते ” ट्विट मारले डिलीट….

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांवर केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल छत्रपतींचे वंशज व भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी अखेर आपली भूमिका मांडली आहे. ‘कालच्या ट्विटमुळं माझ्यासह सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं फडणवीसांनी या प्रकरणी माफी मागावी,’ अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. त्याचवेळी, ‘छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणी शिकवण्याची गरज नाही,’ असं संभाजीराजे यांनी सुनावलं आहे. ६ मे रोजी हा शाहू महाराजांचा स्मृतिदिन. हा दिवस दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळं सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत. त्यामुळं अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शाहू महाराजांना अभिवादन केले. दरम्यान संभाजी ब्रिगेडनेही फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही असा इशारा दिला आहे.
माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
फडणवीस यांनी दरम्यान छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक ‘कार्यकर्ते’ असा केल्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफर टीका होत आहे. फडणवीस यांनी या चुकीबद्दल माफी मागावी अशी मागणी शाहूप्रेमींनी केली आहे. तर, या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादीनंही फडणवीसांवर निशाणा साधला आहे. टीका होताच फडणवीसांनी हे ट्विट डिलिट केलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बुधवारी एक ट्विट केले. त्यात त्यांनी शाहू महाराजांचा उल्लेख “सामाजिक कार्यकर्ते” असा केला. यातील “कार्यकर्ते” हा शब्द अनेकांना खटकला. त्यावरून फडणवीस यांना ट्विटरवर ट्रोल करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही ही संधी साधत फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020
या प्रकरणावर छत्रपतींचे वंशज व भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. संभाजीराजे गप्प का, असा सवाल करण्यात आला होता. त्यावर संभाजीराजे यांनी अखेर भूमिका मांडली आहे. तत्पूर्वी, संभाजीराजे यांनी एक सविस्तर ट्विट करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांंनाही सुनावलं आहे. ‘छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. यापुढंही घेत राहीन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत केली गेली, तेव्हाही देशात सर्वात आधी मी बोललो होतो. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला तेव्हा मी त्यांना माफी मागण्यास भाग पाडलं होतं. काल घरगुती कार्यक्रमात व्यग्र असल्यामुळं मला सोशल मीडियावरील चर्चेबद्दल माहिती नव्हती. हे प्रकरण माझ्यापर्यंत येईपर्यंत ट्विट डिलिट करण्यात आलं होतं. त्यामुळं मी त्यावर बोललो नाही. तरीही एका वर्तमानपत्राला प्रतिक्रिया दिली होती. प्रत्यक्ष कृतीतून बोलण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळं मी काय केलं पाहिजे हे कुणी शिकवण्याची गरज नाही,’ असं संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.