घरात घुसून दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण

भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातल्या गावामध्ये त्यांच्या राहत्या घरातून हे अपहरण करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे ते रहिवासी आहेत. शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेले, अशी तक्रार या जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली आहे. यासीन हे २६ फेब्रुवारी रोजी सुट्टीवर आपल्या घरी परतले होते. जवानाच्या अपहरणाची पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ शोध पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.