Aurangabad : प्लास्टिक पिशवीच्या गोदामाला आग, ८ ते १० लाखांचे नुकसान

नारेगावातील मोसंबी बाग भागात असलेल्या प्लास्टिक पिशवीच्या गोदामाला संशयास्पद आग लागली. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास आगीशी झुंज दिली.
नारेगावच्या मोसंबी बाग भागात शेख मुश्ताक शेख वहाब (रा. समतानगर) यांचे पाच वर्षांपासून प्लास्टिक पिशवी बनविण्याचे गोदाम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून हे गोदाम बंद आहे. या गोदामाच्या सुरक्षेसाठी वॉचमन ठेवण्यात आला होता. मात्र, त्याला शेख मुश्ताक यांनी काही दिवसांपुर्वीच गावी पाठविले. दरम्यान, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. या आगीची माहिती परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलासह शेख मुश्ताक यांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व गोदाम मालक शेख मुश्ताक यांनी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. चिकलठाणा, सिडको, पदमपुरा अशा तिन्ही अग्निशमन दलाच्या चार वाहनांसह पाण्याच्या पाच टँकरचा मारा करण्यात आला. त्यानंतर तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे जवान शुभम आहेरकर, अक्षय नागरे, अमीर शेख, समीर शेख, तन्वीर शेख, अस्लम शेख, मदन ताठे, प्रविण पचलोरे, विशाल निंबाळकर, वाहन चालक विनोद तुपे, दिनेश भांदवे, नंदकिशोर घुगे, शेख रशीद यांनी ही आग आटोक्यात आणली.
गोदामाच्या आवारात सीसी टिव्ही
दरम्यान आग लागलेल्या गोदामाच्या आवारात पाच सीसी टिव्ही कॅमेरे आहेत. ही आग एका अज्ञाताने लावल्याचा संशय शेख मुश्ताक यांनी व्यक्त केला आहे. सीसी टिव्ही फुटेजची तपासणी केल्यावर अज्ञाताची माहिती मिळू शकेल अशी माहिती देखील शेख मुश्ताक यांनी दिली.