करोना फक्त फ्लू नाही… हा एक हल्लाच, ट्रम्प भडकले

अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत ४७ हजाराहून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या आठ लाखांच्याही पुढे आहे. त्यामुळे परिस्थितीला नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहे. दरम्यान त्यांनी आपल्या देशावर झालेला हा हल्ला असल्याचे सांगत चीनवर निशाणा साधला. “आमच्यावर हल्ला झाला आहे. हा फक्त एक फ्लू नाही. हा एक हल्ला होता. १९१७ नंतर कोणीही अशी परिस्थिती पाहिलेली नाही,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे सांगून जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अजिबात आराम करणार नसल्याचेही ते म्हणाले.
अमेरिकेवरील वाढत्या कर्जासंदर्भात प्रश्नाचे उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले की, करोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून सरकारला लोक आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर करावे लागत आहे. यामुळे कर्जाच्या रकमेत वाढ होत आहे.
“आमच्याकडे दुसरा पर्याय आहे का ? अजिबात नाही. मला नेहमीच प्रत्येक गोष्टीची चिंता असते. आम्हाला ही समस्या सोडवावी लागणार आहे,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. “आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था होती. चीन किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा उत्तम होती”. “ आम्ही गेल्या तीन वर्षात अर्थव्यवस्था उभी केली होती. आम्ही पुन्हा त्याच मजबुतीने उभे राहू. पण यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करावी लागणार आहे” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. “आम्ही आमच्या विमान कंपन्या वाचवल्या. आम्ही अनेक कंपन्यांनाही वाचवले. त्यातून अनेक कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात बरीच प्रगती केली होती. पण अचानकपणे या कंपन्या बंद झाल्या असून मार्केटमधून बाहेर गेल्या आहेत,” असे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे सांगताना जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अजिबात आराम करणार नसल्याचे म्हटले आहे. आपण पुन्हा एकदा उभारी घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.