#CoronaVirusUpdate : विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी , परीक्षांचा बॉल राज्यपालांच्या कोर्टात, परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेआहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
परीक्षा कधी, कशा आणि कोणत्या कालावधीमध्ये घ्यायच्या यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात करण्यात आली आहे. या समितीच्या अहवाल आल्यानंतर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा आहे याचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असं सामंत म्हणाले. तसंच या संबंधित समितीने केलेल्या शिफारसी राज्यपाल महोदयांकडे गेल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही सामंत यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाली तर भविष्यात परीक्षा कशा घेतल्या जातील, याबाबत जो काही निर्णय असेल तो वेळोवेळी अधिकृतरीत्या कळविण्यात येईल असं ते म्हणाले.
दरम्यान उदय सामंत यांच्या या निर्णयाला विद्यार्थी भारती या संघटनेनं विरोध केला आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, एका बाजूला मुख्यमंत्री जनतेला बळ देण्याचे काम करत आहेत. लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना सामंत यांनी सहकार्य केलं पाहिजे. शंभर वर्षात पहिल्यांदा आलेली अपवादात्मक परिस्थिती म्हणून शिक्षणमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून समजून घेऊन विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरच्या गुणपत्रिकेच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करावं. परीक्षा रद्द करावी अन्यथा विद्यार्थी भारती परिक्षेवर बहिष्कार टाकेल, असं या पत्रकात म्हटलं आहे