#CoronaVirusEffect : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना , स्वतः आव्हाडही झाले होम क्वारन्टाइन…

https://www.facebook.com/watch/?v=867731587022671
राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. यामध्ये आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. तसेच तेथील पोलिसांशी संपर्क होता. याच दरम्यान करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील करोनाबाधितांची संख्या ४६ वरून अवघ्या २४ तासांमध्ये ७६ पर्यंत पोहचली आहे. सोमवारी दिवसभरात ३० नवे रुग्ण सापडल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे. ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर शासन आणि प्रशासनातील लोक रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड हेदेखील आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे, अशी माहिती आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करू घेतल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं. त्यावर ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.
https://www.facebook.com/jitendra.awhad/