Keral : “थंडरबोल्ट”शी झालेल्या चकमकीत माओवादी नेता ठार, १ जखमी

नक्षलवादी नेता सी. पी. जलील हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बुधवारी (दि.६) ठार झाल्याचे वृत्त आहे. केरळ पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील विथीरी गावात ही चकमकीची घटना घडली होती.पोलिसांच्या माहितीनुसार, पाच नक्षलवाद्यांचा एक गट बुधवारी विथीरी गावातील एका रिसॉर्टमध्ये आला होता. येथे त्यांनी रिसॉर्ट चालकाकडे काही पैसे आणि जेवण मागितले. जेवण केल्यानंतर ते निघून जात असताना केरळ पोलिसांचे ‘थंडरबोल्ट’ पथक तिथे पोहोचले. त्यानंतर पोलीस आणि नक्षलवादी समोरासमोर येताच दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु झाला. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला तर एकजण जखमी झाला. या चकमकीत ठार झालेला नक्षलवादी नेता जलील हा मलप्पुरम जिल्ह्यातील पांडिक्कड येथील रहिवासी आहे. तो गेल्या सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय होता.‘थंडरबोल्ट पथक’ हे केरळ पोलिसांतील नक्षलवादीविरोधी पथक आहे. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी त्यांची खास निर्मिती करण्यात आली आहे. हे सशस्त्र असे घातक पथक आहे.