#CoronaVirus #MaharashtraUpdate : मुंबईत हजाराचा आकडा झाला पार !! तर ६४ जणांचा मृत्यू , ६९ रुग्ण करोनामुक्त…

देशातील इतर राज्यांप्रमाणेच राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले आहेत तर १० जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता १००८ करोनाबाधीत रुग्ण झाले असल्याचे वृत्त असले तरी आतापर्यंत मुंबईत एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
आज मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत करोना सदृष्य लक्षणे असलेले २९२ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ४ हजार ३५ इतकी झाला आहे. मुंबईत आज करोनाबाधीत २१८ नवीन रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये आता लक्षणे नाहीत. ते प्रतिबंधात्मक क्षेत्रातील करोना रुग्णांच्या सहवासीतांपैकी आहेत, असा दावा पालिकेने केला आहे. दिवसभरातील १० मृतांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असेही पालिकेने नमूद केले आहे. करोनाबाधीत ७७५ रुग्णांच्या संपर्कातील ४०२८ जणांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला असून त्यात ३८२ करोनाबाधीत आढळले आहेत. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले असून बहुतेक रुग्णांत आता लक्षणे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत करोनासाठीच्या १६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मरकजशी संबंधित १२ जण ताब्यात…
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथून ‘मरकज’शी संबंधित एक जण ताब्यात; संबंधित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील १२ जण ताब्यात घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील तिसऱ्या करोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरात आढळले १५ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २२५ झाली आह. दरम्यान पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून आज आलेले स्वॅब चाचणीचे सर्व १०३ अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे वृत्त आहे. नगर जिल्ह्यातील २७ वर्षीय गतिमंद तरुणाचा पुण्याच्या ससून रुग्णालयात करोनामुळं मृत्यू, त्याला रक्तदाबाचा त्रास होता. मुंबईच्या दरमधील सुश्रुषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना करोनाची लागण झाल्यामुळं हे रुग्णालय सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२ च्या घरात
नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील बाधित रूगनांची संख्या झाली नऊ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णाची संख्या १२ झाली असून एकाचा मृत्यूझाला आहे. राज्यात पुण्यात १५, अकोल्यात ४, बुलडाण्यात २ आणि रत्नागिरीत एक करोना रुग्ण आढळला आहे. अकोल्यात चार रुग्ण आढळल्याने अकोल्यातील रुग्णांची संख्या १३वर पोहोचली आहे. या रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचं आढळून आलं आहे. आज सापडलेले हे चारहीजण आधीच्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एका साडेतीन महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. हे चारही रुग्ण बैजपुरा या चिंचोळ्या परिसरातील आहेत. हा परिसर प्रशासनाने आधीच सील केला आहे.
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. नवी मुंबईत करोनामुळे एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. तो खारघर येथे राहत होता. गेल्या आठवड्याभरापासून तो आजारी होता. ३१ मार्च रोजी त्यानं मद्यप्राशनही केलं होतं. त्याला डेंग्यू आणि करोनाची लागण झाली होती, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
ठाण्यात आढळले कोरोनाचे २१ रुग्ण
ठाण्यात आज २१ करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी कळवा येथे १२ तर मुंब्रा येथे ९ रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे मुंब्र्यात एकाचवेळी पाच जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळसेकर हॉस्पिटलमध्ये संपर्कातून या पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे. दरम्यान, काल कळव्यात एका सहा वर्षाच्या मुलीला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच सांगली जिल्ह्यातील मिरज येथील २६ करोना रुग्णांपैकी २४ जणांचे दुसरे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केलं आहे.