#CoronaVirusEffect : थट्टा म्हणून व्हिडीओ तयार केला आणि अभियंता पोलीस कोठडीत गेला…

कोणत्याही आजारावर विनोद , थट्टा करण्याचे कोणी भारतीय लोकांकडून शिकावे . जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्यात जात आहेत. पण अशा गंभीर वातावरणात एका आयटी इंजिनीअरने करोनावर प्रँक केला. हा प्रँक त्याला खूप महागात पडला आणि थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली. इंजिनीअर मुजीब मोहम्मद (वय ३८) असे या अभियंत्याचे नाव आहे.
या कर्तबगार अभियंत्याने ‘चला एकजूट व्हा आणि सर्वांनी बाहेर पडा. बाहेर आल्यावर मन मोकळेपणाने शिंका आणि हा व्हायरस पसरवा’, असं म्हणत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. एक प्रँक म्हणून त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पण सोशल मीडियावरून त्याच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली. अशा तणावाच्या आणि गंभीर वातावरणात असा प्रकार योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं. यानंतर या प्रकरणाची दखल इन्फोसिसनेही घेतली.
दरम्यान इन्फोसिसने या प्रकरणाची आधी चौकशी केली. यानंतर मुजीब मोहम्मद याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. इन्फोसिसने त्याला नोकरीवरून काढल्यानंतर पोलिसांनी मुजीबला शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्याच्यावर कलम ५०५, २७० आणि १९० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. करोना व्हायरस पसरवण्यासाठी चिथावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे, बेगळुरूचे पोलीस उपायुक्त कुलदीप जैन यांनी ही माहिती दिली. आयएएनएसने हे वृत्त दिलंय. पोलिसांनी मुजीबला आज स्थानिक कोर्टात हजर केलं. मुजीबने सायबर कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे. त्याची चौकशी करायची आहे. यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली. कोर्टाने पोलिसांचं मागणी मान्य करत मुजीबला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.