#CoronaVirusrEffect : महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी , रुग्णांची संख्या १०१ वर…

राज्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असतानाही आज राज्यात आणखी चार नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
दरम्यान राज्यात आज करोनामुळं ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. या मृत्युमुळं राज्यातील करोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. आज मृत्यू झालेला हा इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं संबंधित व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. ‘करोना’च्या आजाराची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उत्तरोत्तर प्रकृती खालावत जाऊन आज त्याचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.