#CoronaVirusEffect : पुण्यातील रस्त्यावर इतर वाहनांना तूर्त बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यभरात कलम १४४ लागू करण्याची घोषणा करत जमावबंदी केली आहे. मात्र तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. अनेकजण शहरातून गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid – 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. त्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यावेळी पुणे पोलिसांनी पुणेकरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांना क्वारंटाइनचा शिक्का असलेला व्यक्ती दिसल्यास पुणे पोलिसांना 1800 233 4130 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. पुणे पोलिसांची १३६ होम क्वारंटाइनमध्ये राहायला सांगितलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता झालेले कदाचित त्यांच्या गावी वा दुसरीकडे वास्तव्यास गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.