पुण्यात टिम्बर मार्केट मधील लाकडांचे तीन गोडाऊन जळून खाक

देशभरात आज जनता कर्फ्यू असताना पुण्यातील टिंबर मार्केटमधील लाकडाच्या तीन गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टिंबर मार्केटमधील विजय वल्लभ शाळेशेजारी असलेल्या तीन लाकडाच्या गोडाऊनला रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. या परिसरात प्लायवूडची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे तेथील अंदाज लक्षात घेता, सुरुवातीला ७ गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. मात्र आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने, टप्प्याने गाड्यांची संख्या वाढवून २० गाड्याच्या मदतीने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत लाकडाचे गोडाऊन जळून खाक झाले असून ही आग कशामुळे लागली हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.