#CoronaVirusUpdate : ऐकावे ते नवलंच !! ऐकतच नव्हते “हे” कुलगुरू महाशय, जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर करून केले डिटेंड !!

देशभरात आणि संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूबाबत काळजी घेतली जात असतानाच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ. ए. एल फरांदे यांना अक्षरशः जबरदस्तीने ‘डिटेंड’ करून आयसोलेशन वार्डमध्ये ठेवावे लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरूवारी हा सर्व प्रकार घडल्याचे उघडकीला आले आहे. आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही बातमी पोहोचल्याने राज्यभर जबाबदार पदावरील लोकांच्या बेजबाबदारपणाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. ‘कोरोना’च्या निमित्ताने जागतिक वातावरण ढवळून निघत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनाला सर्वसामान्य नागरिक प्रतिसाद देत असताना जबाबदार पदावरील काही लोक मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरीमध्ये हा प्रकार घडला असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे यांना अक्षरश: डिटेंड करून आयसोलेशन वार्डमध्ये ठेवावे लागले. हे दोघे अमेरिकेतून एका परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी परतले होते. कॉन्फरन्स अटेंड करून परवा भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर “होम क्वारंटाईन”चे शिक्के मारण्यात आले होते. असे असूनही या दोघांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते राहुरी असा बिनदिक्कत भेटीगाठी घेत प्रवास केला असल्याचे वृत्त आहे. एव्हढेच नव्हे तर या दरम्यान विद्यापीठाच्या काही केंद्रावर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल सत्कारही स्वीकारल्याचे समजते.
दरम्यान या कुलगुरू महाशयांनी वाटेतच विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्व कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठात्यांना फोन करून राहुरीत तातडीने बैठकीसाठी बोलून घेतले होते. विशेष म्हणजे हे दोघेजण ज्या विमानाने दिल्लीपर्यंत आले त्या विमानांमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे, त्यामुळे काळजी वाढली आहे. या दोन्ही जबाबदार पदावरील व्यक्तींनी दाखवलेल्या बेजबाबदारपणाबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एअरपोर्ट ओथॅंरीटीकडून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या दोघांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री पाठवण्यात आली. कुलगुरू महोदय दोन दिवस सर्व विद्यापीठांच्या कर्मचारी विद्यार्थ्यांकडून ‘अमेरिका रिटर्न’ झाल्याबद्दल सत्कार स्वीकारण्यात दंग होते. या गडबडीत सर्व सहयोगी अधिष्ठाता यांची बैठक देखील पार पडली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी कुलगुरूंशी बोलले आणि “सेल्फ क्वारंटाईन” होण्याची विनंती केली. त्यावर कुलगुरूंची उत्तर दिले कि , “मला काही झाले नाही आणि होणारही नाही”. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तहसीलदारांना आदेश दिला. त्यानंतर कुलगुरू विश्वनाथ आणि डीन डॉ. फरांदे यांना डिटेंड करून आता राहुरीच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे.