#CoronaVirusUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्शवभूमीवर ‘कोविड १९’ आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मार्च रोजी रात्री ८.०० वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या दरम्यान, कोविड-१९ शी दोन हात करण्यासाठी विविध उपायांबद्दल पंतप्रधान मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राशिवाय अनेक राज्यांतील सरकारनेही नागरिकांना आवश्यक नसेल तर घरातून बाहेर न पडण्याचे आणि करोना संक्रमण रोखण्याचं आवाहन केलं आहे. अनेक कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊसनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास बजावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे.
आत्तापर्यंत देशातील एकूण १५३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तसंच ३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आत्तापर्यंत १४ करोना रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीय नागरिकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. ईराणमध्ये सर्वाधिक म्हणजे २५५ भारतीय करोनाग्रस्त आहेत. या व्यतिरिक्त हाँगकाँगमध्ये १ भारतीय, इटलीत ५, कुवैत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ आणि सौदी अरबमध्ये १२ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सरकारने ज्या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा देशांतून मायदेशात परतणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.