Corona Virus Effect : देशातील सगळ्या शाळा , जलतरण तलाव , मॉल ३१ मार्चपर्यंत बंद , केंद्राचा मोठा निर्णय

Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry on #Coronavirus: Important measures including closing of schools, swimming pools, malls, allow employees to work from home,less use of public transport, 1 meter distance between people should be maintained till 31st March. pic.twitter.com/Bk08PfhvHZ
— ANI (@ANI) March 16, 2020
करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारनं हालचालींना वेग दिला आहे. सोमवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयाकडून या जीवघेण्या व्हायरसला थोपवण्यासाठी काही निर्देश जारी करण्यात आलेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी देशातील सगळ्या शाळा, जलतरण तलाव, मॉल इत्यादी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी, यामुळे सार्वजनिक परिवहन सेवेचा भार आणि धोकाही कमी होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान ईराणहून भारतीयांचा चौथा गट आज मायदेशात परतला आहे. यात ५३ नागरिकांचा समावेश असून सर्वांना प्रोटोकॉलनुसार, जैसलमेरमध्ये विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीय. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं कॉल सेंटर सुरू केले आहेत. हे कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ११४ वर पोहचली आहे. देशात करोना व्हायरसचे चार नवीन रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण ओडिसा, जम्मू-काश्मीर, लडाख आणि केरळमध्ये आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५२०० हून अधिक लोकांची ओळख पटवण्यात आलीय. त्यांनाही देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. देशात आत्तापर्यंत १३ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र करोनामुळे आत्तापर्यंत देशात दोन जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.