Corona Virus Update : केरळमधील केंद्रीय शासकीय वैद्यकीय संस्थेतील ३० डॉक्टर कोरोना संशयाच्या विळख्यात !!

देशभरातून कोरोना व्हायरसच्या अनेक बातम्या येत असून केरळमधील एक डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर आता त्यांच्या सहकाऱ्यांनाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तिरूवनंतपूरममधील श्री चित्रा तिरूनल इन्स्टिट्युट फॉर मेडीकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजीमधील (SCTIMST) हे डॉक्टर आहेत. सर्व ३० डॉक्टरांना आता देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. SCTIMST हे इन्स्टिट्युट केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येतं. कार्डिऑलॉजी आणि न्यूरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर या SCTIMST मध्ये आहेत.
SCTIMST मधील एक डॉक्टर स्पेनमधून १ मार्च भारतात आले होते. त्यांची रविवारी करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले. हे डॉक्टर २ मार्चला कामावर रूजू झाले. यानंतर ८ मार्चला त्यांचा घसा दुखू लागला. कामावर असताना त्यांनी मास्क घातला होता. १० आणि ११ तारखेला त्यांनी रुग्णांची तपासणीही केली होती. अखेर १२ तारखेला त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं. करोनाचा प्रादुर्भाव झालेला देशांमध्ये स्पेनचाही समावेश आहे. १४ मार्चला त्या डॉक्टरांची पुन्हा करोना चाचणी केली गेली. या चाचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचं रविवारी स्पष्ट झालं.
दरम्यान या इन्स्टिट्युटमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनाच निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याने इन्स्टिट्युटच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, ज्या ३० डॉक्टरांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे त्या पैकी काही डॉक्टरांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेतला होता. यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.