ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत डॉ. नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण….

ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता सीएए व एनआरसीबद्दल बोलताना मी केलेले वक्तव्य मनुवाद व चातुर्वर्ण्याच्या विरोधात होते. माझा रोख मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. ,’ असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलं आहे.
नागपुरात महिला दिनाचे औचित्य साधून फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीने डॉ. नितीन राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी सीएए, एनआरसी व एनपीआरला विरोध दर्शवताना राऊत यांनी ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य करताना “स्वतः बामन स्वत: परदेशातून आले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. आमच्याकडं प्रमाणपत्र मागताहेत. हे कदापि खपवून घेणार नाही”, असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ माजला. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर चौफेर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच, त्यांच्याविरोधात नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली. राऊत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण संघटनांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. ‘काँग्रेस पक्ष ब्राह्मण नव्हे तर चातुर्वर्ण्य आणि मनुवाद मानणाऱ्या ब्राह्मण्यवादी विचारांचा विरोध करतो. काँग्रेस पक्षातर्फे अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यात अनेक ब्राह्मण होते आणि आहेत. पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राह्मण नेते अग्रेसर होते आणि आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.