Corona Virus Effect : सावधान !! देशात साथरोग प्रतिबंधक कायदा, आदेशाचे उल्लंघन केल्यास होऊ शकते ६ महिन्याची शिक्षा…

देशातील कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड-19 ला आपत्ती घोषित केलं आहे. दरम्यान कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic diseases act) लागू करण्यात आला आहे. हा कायदा १२३ वर्ष जुना आहे. एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. राज्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार दिले जातात.महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
राज्यातील सर्वच कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सगळ्या शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला ४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे. सरकारने कोरोनाव्हायरसला आपत्ती घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत (Disaster Response Funds – SDRF) मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी ४ लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण ९६ रुग्ण आहेत. त्यापैकी १० रुग्ण बरे झालेत, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक इ. राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात एकही नवीन रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
https://twitter.com/PIB_India/status/1238764453451030529