Corona Virus Effect : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६ वर , मयताच्या नातेवाईकांना ४ लाखाची मदत , केंद्राकडून “कोविड-१९” राष्ट्रीय आपत्ती

Maharashtra Health Minister Rajesh Tope: Total positive #Coronavirus cases in the state rise to 26. (file pic) pic.twitter.com/E74mAJIr1O
— ANI (@ANI) March 14, 2020
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या २६ वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे देशात आता कोरोना व्हायरसची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या २६ वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून येत्या ३१ मार्चपर्यंत खासगी , सरकारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत आज दिली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे – १० , नागपूर – ४, यवतमाळ – २, ठाणे – १, अहमदनगर – १, कल्याण १, पनवेल – १, नवी मुंबई – १, मुंबई – ५ अशी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात एका संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत. पूर्व आफ्रिकेत सापडलेला पहिला कोरोना रुग्ण मुंबईहून संसर्ग घेऊन गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई आणि परिसरातून चार नव्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या देशात सर्वाधिक झाली आहे.
Maharashtra Health Minister Rajesh Tope: All malls will remain closed till 31st March in the state, in view of #CoronavirusPandemic. pic.twitter.com/2M0Q3Y4zyH
— ANI (@ANI) March 14, 2020
राज्य शासनाच्या आदेशांनंतर कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यासंबंधी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत ३१मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान सर्व सरकारी कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. राज्यातल्या काही शहरांमध्ये जिम आणि थिएटरही बंद ठेवण्यात आली आहेत. आदेश न पाळणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 ला आपत्ती घोषित केलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला ४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाव्हायरसला राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत मदत म्हणून हा निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी ४ लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे.