देशभरात कोरोनाचा कहर चालू असतानाच केरळमध्ये “बर्ड फ्लू “, ४००० कोंबड्या हटविण्याचे काम सुरु

देशभरात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातलेला असतानाच केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ आल्याचे वृत्त आहे. केरळच्या मलप्पुरममधील परप्पनगडी येथे बर्ड फ्लू आढळल्याने केरळ सरकार सतर्क झाले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी केरळ सरकारने आता कोंबड्यांचे कलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांपासून धोका असल्याचा किंवा नुकसान होण्याचा संभव असल्याचा संशय निर्माण झाल्यास अशा कोंबड्या किंवा पोल्ट्री फार्म हटवणे याला कलिंग असे म्हणतात.
Malappuram: Kerala government has ordered poultry culling after Bird flu was detected in Parappanangadi; Disease Inspection Officer, says, "10 special squads have been deployed to cull all poultry within 1km radius of the epicentre". pic.twitter.com/VKpgdiKGOg
— ANI (@ANI) March 14, 2020
याबाबतची प्रकरणे समोर आल्यानंतर त्यावरील उपचारांसाठी एक किलोमीटरच्या परिसरात १० विशेष पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती आजार तपासणी अधिकाऱ्याने दिली आहे. हे पथक सुमारे ४००० कोंबड्या हटवण्याचे काम करणार आहे. या बरोबरच ज्या ठिकाणी बर्ड फ्लू आढळला आहे अशा परिसराच्या १० किलोमीटरच्या परिघातील चिकन स्टॉल्स आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जफर मलिक यांनी दिली.
दरम्यान बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता केरळमध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोंबड्यांची ने-आण करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. १४ मार्च ते १६ मार्च या कालावधीत कलिंग केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मलिक यांनी दिली. कोंबड्याचे कलिंग केल्यानंतर त्यांचा मल आणि अंडी देखील जाळली जातील असे मलिक म्हणाले. बर्ड फ्लू पसरण्याचा संशय संपून जावा हा या मागील उद्देश असल्याचे मलिक म्हणाले. मलप्पुरमपूर्वी कोझीकोड येथे देखील बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले होते.