Corona Virus Effect : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार तर नागपुरातील संशयित पसार …

दिल्लीत करोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यास दिल्लीतील निगमबोध घाट येथे नकार देण्यात आला. यामुळे पीडित कटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कारासाठी नकार मिळाल्यानंतर या कुटुंबाला लोधी रोड येथील स्मशानभूमीतही महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू दिले गेले नाहीत.
या महिलेचा काल दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात करोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता . भारतात करोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. मात्र, आज या महिलेवर अत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय निगमबोध घाटावर गेले असताना तेथून त्यांना अंत्यसंस्कारासाठी नकार देण्यात आला. त्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीच्या प्रमुखांना फोन लावून अंत्यसंस्काराची विनंती केली. मात्र महिलेचा मृतदेह इथून ताबडतोब दुसरी कडे न्या आणि अन्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करा असे उत्तर पीडित कुटुंबाला मिळाले. त्यानंतर त्रस्त झालेल्या या पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी लोधी रोड स्मशानभूमी गाठली. इथे अंत्यसंस्कार होऊ शकतील या आशेने कुटुंबीय मृतदेह घेऊन तेथे पोहोचले होते. मात्र, तिथेही त्यांना नकारच देण्यात आला.
नागपुरात संशयित रुग्ण झाले पसार…
दरम्यान मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळल्याने पोलिस आणि मेयो प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. मेयो प्रशासनाला ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. दरम्यान, चारही रुग्ण घरी असल्याचे कळताच मेयो प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. या चारपैकी तीन रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहे. या सर्व रुग्णांना पुन्हा मेयोत आणले जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.