पुन्हा एकदा रामदास आठवले , “कोरोना गो ” नंतर आता दिला ” महाविकास आघाडी गो…” चा नारा !!

जगभरात आणि देशभरात कोरोना व्हायरसची चर्चा चालू असताना आपल्या हटके शैलीने कायम चर्चेत असलेले रिपाइं नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ‘गो करोना गो’ च्या व्हिडीओमुळे पुन्हा जोरदार चर्चेत आलेले असतानाच त्यांना भाजपने पुन्हा एकदा राज्यसभेचे तिकीट दिल्यानंतर त्यांनी आता ‘महाविकास आघाडी गो’ असा नारा दिला आहे. आठवलेंच्या या नव्या घोषवाक्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
विषय असा आहे कि , रामदास आठवले यांना भाजपने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठवले यांनी आज विधान भवनात जाऊन राज्यसभेचा अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘करोना’च्या आजारावर आपली प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वीच आठवले यांचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आठवले यांच्यासोबत काही विदेशी नागरिकही होते. हे सर्वजण मिळून ‘कोरोना गो’, ‘कोरोना गो’ अशा घोषणा देत होते. त्याबद्दल आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी कोरोनाला गो म्हटलेलं असल्यामुळं तो महाराष्ट्रात आणि भारतातही जास्त प्रमाणात आलेला नाही. असं असलं तरी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं असलं तरी तो येऊ नये यासाठी काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि डॉक्टरांचीही जबाबदारी आहे. ‘करोना’ची लागण आपल्या गावात व शहरात कुणाला होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.’ ‘कोरोना’ देशातून जात नाही तोपर्यंत मी ‘कोरोना गो, कोरोना गो’ असं म्हणत राहणार आहे. ‘कोरोना’ला घालवताना ‘महाविकास आघाडी गो’ असंही आम्ही म्हणणार आहे, असा चिमटा आठवले यांनी काढला. त्यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.