Mumbai Crime : एपीआय सिध्दवा जायभाये यांच्यावर गोळीबार , हल्लेखोर पसार

मुंबईच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारातून सिद्धावा जायभाये थोडक्यात बचावल्या आहेत. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये या मुंबई अहमदाबाद महामार्गावरून आपल्या घरी जात असताना विरार जवळील नोव्हेल्टी हॉटेलजवळ पोहोचल्या होत्या. तिथूनच पुढे असलेल्या बर्गर किंगमध्ये काही तरी घेण्यासाठी त्या गाडी थांबवून उतरल्या होत्या.
दरम्यान बर्गर किंगकडे जात असताना त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून येऊन जायभाये यांच्यावर एक राउंड फायर केला आणि दुसरा राऊंड फायर करणार इतक्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड फेकून मारल्यानंतर तो पळून गेला आहे. या हल्लेखोराने मास्क लावलेला होता. अंगात फुल्ल रेड ब्लॅक जॅकेट घातलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. हे हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांनी सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार का केला, याचा तपास पोलीस करीत असून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.