महाराष्ट्राचा अर्थसंकलप २०२० : अर्थसंकल्प कसला ? हे तर पोकळ भाषण , देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्राचा अर्थसंकलप सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी , राज्याच्या डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, जीएसटी परताव्यास होणारा विलंब यामुळे तिजोरीत झालेला खडखडाट, शेतकरी कर्जमाफीचे आव्हान, बेरोजगारी अशा आव्हानांनी बेजार झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या पथावर आणण्याचा संकल्प करीत महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला. मात्र महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ भाषण आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसतं भाषण केलं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून उद्योग धंद्याना सवलत देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कात १ टक्के कपात केली. पीक कर्जांसाठी वनटाईम सेंटलमेंटची योजना आणली आहे. त्यामुळे हा सर्वसमावेश अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि , अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं. हे केवळ अर्थमंत्र्यांचं भाषण होतं. त्यात कुठलीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण नव्हतं. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे. किती तूट राहील किंवा अधिक्य राहील अशा कुठल्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. अर्थसंकल्प समतोल नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यात येतात याचा विसर पडला आहे. या विभागांसाठी काहीही देण्यात आलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. अर्थमंत्र्यांनी भाषणात केवळ कोकणचा उल्लेख केला. पण खरं तर कोकणच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. कर्जमाफीची घोषणा करत असताना, मुदत कर्जाच्या संदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. त्यामुळं शेतकऱ्याचा सातबारा कोरा होऊच शकत नाही, असं ते म्हणाले.