Pulwama Attack : ‘सुसाइड बॉम्बर’ आदिल अहमद दारला आश्रय देणाऱ्या दहशतवाद्याला एनआयए कडून अटक

पुलवामा हल्ल्यात हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला एनआयएने अटक केली आहे. शाकिर बशीर मगरे (२२) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शाकिर हा पुलवामातील काकापोरा येथील हाजीबालचा राहाणारा आहे. फर्निचर शॉपचा मालक असलेल्या शाकिरने पुलवामा हल्ल्यातील ‘सुसाइड बॉम्बर’ आदिल अहमद दार याला आपल्या घरात आश्रय दिला होता. तसेच आयईडी बनवण्यातही मदत केली होती.
या कारवाईबाबत एनआयएने तपशील जारी केला आहे. शाकिरचा पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग होता. हा आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी आदिल अहमद दारला सर्वप्रकारची मदत शाकिरने केली होती. शाकिरच्या अटकेने या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती येण्याची शक्यता आहे. आदिल आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूख या दोघांना पुलवामा हल्ल्याच्या आधी २०१८ पासून आपल्या घरात आश्रय दिल्याची कबुली शाकिरने दिली आहे. शाकिरला न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. आयईडी स्फोटात ४० जवान शहीद झाले होते.