देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात , चार ठार

देवदर्शनासाठी गेलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चार भाविकांचा गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. हे भाविक कुबेर भंडारी मंदिरात दर्शन घेऊन कारने परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
नंदकिशोर संपत, किशोर कोल्हे, गोरख घोरपडे आणि प्रवीण शिरसाठ अशी अपघात मृत झालेल्यांची नावे आहेत. ते शनिवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी पिंपरी निर्मळ येथून इर्टीका मोटारीने (एम.एच.१७, ए झेड.-४५७) गुजरात येथील कुबेर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. दर्शनावरुन रविवारी दुपारी ते परतीच्या प्रवासात असताना नर्मदा शहरानजीक ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रककडे दुर्लक्ष झाल्याने कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यातच या चौघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा गुजरातमधील राजपिपला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गुजरातमधील नर्मदा पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून महाराष्ट्र पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या अपघाताचे बातमी पिंपरी निर्मळ व कोल्हार खुर्द येथे समजताच या दोन्हीही गावात शोककळा पसरली. तर मृताच्या नातेवाईकांनी गुजरातच्या दिशेने धाव घेतली आज त्याच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.